प्रस्तावना
आमचे तीर्थरूप वडील, जेष्ठ गुरूबंधू, स्वामी अमलानंद तथा श्री. ल. रा. फडके यांची नुकतीच वेबसाइट एक जेष्ठ गुरुभगिनी, सौ. उमाताई पालव यांनी तयार करून एक मोठी गुरुसेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. हे ऐकून मला मनस्वी समाधान व आनंद झाला. सुदैवाने ही वेबसाइटपण पेण मुक्कामी आमच्या वास्तुत प्रत्यक्ष बघण्याचा योग आला. सौ. पालवबाई यांजकडून केली गेलेली गुरुसेवा ही अत्यंत मौलीक व काळाच्या गरजेनुसार वाटली. या त्यांच्या अशा कृतीची अत्यंत गरज होती.
स्वामी अमलानंद हे कलीयुगातील संसार व परमार्थ यांची उत्तमप्रकारे सांगड घालणारे असे संत होऊन गेले व त्यांचेवरती प. पू. स्वामी स्वरूपानंदांची तसेच परमहंस रामकृष्णांच्या तत्वज्ञानाची पक्की पकड होती व त्याप्रमाणे ते साधकास साधकाच्या कुवतीनुसार मार्गदर्शन करीत असत. स्वामी अमलानंद म्हणत असत की साधकांनी नेहमी संसार करून परमार्थ करावा म्हणजे त्यांचे परमार्थात अध:पतन संभवत नाही. जो उत्तम संसार करेल तोच उत्तम परमार्थ करू शकतो हे स्वामी अमलानंदांच्या परमार्थावरून दिसून येते. परमार्थ हा एक आंतरिक विषय असल्याने तो कोणाच्यावरती लादता येत नाही व अशा शिष्याची त्याच्या जीवनांत होणारी भावी फसगत टाळता येऊ शकते. परमार्थामधे जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो व सदभक्त त्याचे उर्वरीत जीवनात शाश्वत गोष्टींचा स्वीकार करतो व अशाश्वत गोष्टींचा त्याग करतो. थोडक्यात म्हणजे सदगुरू प्राप्तिनंतर साधना करीत असताना साधकाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन पार बदलू शकतो व कायम टिकणारे असे शाश्वत सुख याचा साधकाकडून स्वीकार केला जातो व आंतरिक घडणार्या सर्व गोष्टींचे विचारपूर्वक निर्णय घेतले जातात. आमचे सदगुरू स्वामी स्वरूपानंद म्हणत असत की खरा परमार्थ हा परिस्थितीत बदल करीत नसून प्राप्त परिस्थितीत सुखसमाधानाने कसे पार होता येईल हे शिकवत असतो. त्यामुळे बाह्य घडणार्या गोष्टींचा सर्व द्वंद्वांचा साधकाचे जीवनावर काहीही परिणाम होत नाही व असे साधक घडणार्या सर्व गोष्टींकडे अलिप्ततेने, शांततेने, साक्षित्वाने सर्व गोष्टी न्याहाळू शकतात. तसेच त्यांना त्यांच्या उर्वरित आयुष्यात सहजसमाधीचा आनंदही होवू शकतो. सकार हा आदिमाया पार्वतीचा व हकार हा आदिनाथांचा तथा भगवान शंकराचा यांचे चिद्दविलासातून जन्माला आलेला तो गणपती याचे दर्शन साधना करीत असताना सर्व प्रथम होते हे विसरून चालणार नाही. तात्पर्य म्हणजे आपण सारे गाणपत्य आहोत म्हणून साधनेच्या सुरवातीस गणपतीचे दर्शन सगुण-निर्गुण स्वरूपात होते हे सत्य आहे.
प. पू. स्वामी स्वरूपानंदांनी दिलेली सोsहं साधना ही अतिशय उच्च अवस्थेची असून त्याचेपुढे कोणतीही साधना रहात नाही. ज्या साधकास सोsहं प्राप्ती झालेली आहे त्यांनी स्वत:ला कधीही कमी लेखू नये व सोsहं च्या अनुसंधानात राहण्याचा काटेकोरपणे प्रयत्न करावा म्हणजे साधक गुरूपदी सहजगत्या पोहोचू शकतात. स्वामी अमलानंद सांगत असत की भक्तीच्या बरोबरीला जर ज्ञानाची जोड असली तर सदर साधक ज्ञानोत्तर भक्ती करतो व संसार परमार्थाची सांगड व्यवस्थित घालू शकतो व आयुष्यात घडणारी स्वत:ची फसगत उत्तम प्रकारे टाळू शकतो. परमार्थामुळे आंतरिक येणारी संन्यस्त वृत्ती हाच खरा संन्यास आहे व अनुभवांनी प्राप्त झालेली संन्यस्त वृत्ती ही अध:पतन होऊ देत नाही व त्याला उच्चपदी कायमस्वरूपी आरूढ करण्यास मदत करते व त्याचीच कलियुगात अत्यंत जरूर आहे ह्याचे सर्व गुरुबंधुभगिनींनी ध्यान ठेवावे व आपले उर्वरित आयुष्य शाश्वत सुखातच दवडावे असे वाटते. भोग जरी आंतरिक आनंद देत असले तरी भोगाचे आयुष्य हे अत्यंत अल्प असते व त्यांचे मागे लागल्याने मनस्वी त्रास होण्याची शक्यता असते. असा होणारा त्रास साधकांनी टाळला पाहिजे असे वाटते. संसारामध्ये साधकाच्या नजरेपुढे अनेक प्रकारचे लोभ येत असतात व त्याच्यावरती संयमाने बंधन घालणे अत्यंत जरुरीचे आहे हे जाणूनच प. पू. स्वामी अमलानंदांनी कोणालाच संन्यास दिलेला नाही व संसार करून परमार्थ करा हे सांगत असत हे योग्य वाटते. कारण संन्यास घेता येणे सोपे आहे, पण तो शेवटपर्यंत सचोटीने पचविणे कठीण आहे. कारण मनुष्य जरी संन्याशी झाला तरी त्याला पण षडविकार, पंचमहाभूते यांतूनच जायचे असते व त्यातून प्रवास करत असताना त्याला आजूबाजूच्या घडणार्या प्रसंगाशी चातुर्याने सदगुरूंच्या स्मरणात राहूनच तोंड द्यायचे असते.
सौ. उमाताई पालव यांनी नुकतीच एक सदगुरूंची सेवा म्हणून यशस्वी केलेले कार्य म्हणजे वेबसाइट प्रसिध्द करून एक प्रकारे मामांची सेवा केलेली आहे असे मानतो. अशाच प्रकारचे कार्य ह्यापुढेही सदगुरू स्वामी अमलानंदांचे चरणी घडावे व ज्ञानी साधक निर्माण होण्यास त्यांचेकडून अशीच सेवा घडो ही सदगुरुचरणी नम्र प्रार्थना करतो.
॥अल्लख निरंजन॥
दिनांक : २ नोव्हेंबर २००९ |
स्वामी सहजानंद |
कार्तिक शुक्लपक्ष, त्रिपुरारी पोर्णिमा |
तथा पु. ल. फडके |
श्री. शालिवाहन शके १९३१ |
|
|